सांगली शहरातील विश्रामबागचे निरीक्षक ईश्वर ओमासे, शहरचे निरीक्षक संजय मोरे यांनी कॅफे चालकांना पाठिशी घातल्यामुळेच त्याचे लोण पसरले आहेत. त्यांची खातेनिहाय चौकशी व्हावी. तसेच कॅफे चालकांकडून हप्ते घेणाऱ्या दोन पोलिस कर्मचाऱ्यांचीही चौकशी व्हावी, अशी मागणी शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थानचे संस्थापक नितीन चौगुले यांनी मंगळवारी पत्रकारांशी बोलतांना केली.
दरम्यान, पोलिस अधीक्षक संदीप घुगे यांनी तातडीने दखल घेवून जिल्हाभर तपासणीचे आदेश दिले. त्यांच्या या भूमिकाचे शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थानकडून कौतुक करण्यात आले. यावेळी तोडफोडीतील संशयितांचा जामीन मंजूर झाल्याचेही त्यांनी सांगितले.
चौगुले म्हणाले, कॅफेतील गैरप्रकाराबाबत वर्षभरापासून आवाज उठवला जात आहे. गृहमंत्र्यांपर्यंत निवेदने देण्यात आली. सभागृहातही चर्चा झाली. त्यानंतर कारवाईचे आदेश दिले. काही प्रमाणात कारवाई झाली. परंतू पुन्हा कंपार्टमेंटच्या नावाखाली मिनी लॉजेस सुरू झाले आहेत. त्यामुळे शंभर फुटी रस्त्यावरील कॅफेत बलात्काराची घटना घडली. पोलिसांकडून कारवाई न झाल्याने उद्रेक झाला. त्यानंतर राजकीय, सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांनी आमच्या आंदोलनाला पाठिंबा दिला. छत्रपती उदयनराजे यांनीही दखल घेतली.
ते म्हणाले,‘‘कॅफे चालकाला पाठीशी घालणारे पोलिस दोन अधिकारी या अत्याचारला जबाबदार आहेत. त्यांच्यावरही कारवाई झाली पाहिजे. कॅफे चालकांकडून हप्ते गोळा करणाऱ्या विश्रामबागचे प्रशांत माळी, शहरचे गौतम कांबळे यांचीही चौकशी व्हावी. आमच्या आंदोलनामुळे दुखावलेल्या पोलिस अधिकाऱ्यांनी आमच्या कार्यकर्त्यावर गंभीर गुन्ह्यांची कलमे लावली. गुन्हेगारासारखी वागणूक दिली. पण आम्ही आमचे आंदोलन थांबणार नाही. पोलिसांच्या मुस्कटदाबीला सांगलीची जनता बळी पडणार नाही. गुन्ह्यात माझे नाव घेण्यासाठी विश्रामबागचे सहायक निरीक्षक कुंभार यांनी कार्यकर्त्यांवर दबाव टाकला. योग्य कारवाई झाली नाहीतर सांगली बंद आंदोलन केले जाईल. हजारो विद्यार्थी व पालक यांना सोबत घेऊन विश्रामबाग पोलिस ठाण्यावर मोर्चा काढला जाईल.’’
चौगुले म्हणाले, ‘‘महापालिका आयुक्त शुभम गुप्ता यांनाही आम्ही आंदोलनाची माहिती दिली. त्यांनी सर्व कॅफेच्या परवान्याविषयी चौकशी करण्याचे आश्वासन दिले.आमदार सुधीर गाडगीळ यांनी यापूर्वीच लक्ष घातले असते तर आम्हाला आंदोलनाची वेळ आली नसती. त्यांच्या कार्यालयाच्या परिसरातच अनेक कॅफे सुरु आहेत. काही कॅफेमध्ये मिनी लॉजसारख्या रचना आहेत. अद्यापही उर्वरित दोन कॅफेवरही गुन्हे दाखल झालेले नाहीत. शहरातील सर्व कॅफे तातडीने सील करावेत, अन्यथा आतील कपार्टमेंट काढून टाकले जाण्याची शक्यता आहे.’’
...
मुलींनी आमच्याकडे तक्रार द्यावी
नितीन चौगुले म्हणाले, शहरात अनेक ठिकाणच्या कॅफेत धमकी देवून अत्याचाराच्या घटना घडल्या असण्याची शक्यता आहे. त्या पीडित मुलींनी न घाबरता आमच्याकडे तक्रार द्यावी. त्यांचे नाव गोपनीय ठेवण्यात आली. संबंधित कॅफेला मात्र, आमच्या स्टाईलने उत्तर दिले जाईल. आमच्या माता बहिणींसाठी आम्ही असे अनेक गुन्हे अंगावर घ्यायला तयार आहोत.’’
Tags
सांगली प्रतिनिधी