लोकांनी वर्गणी काढून 5000 डिपोझिट भरून उभा केलं उमेदवार

सामान्य कार्यकर्ता लोकाग्रहास्तव मैदानात — सराफ कट्ट्यातील सामान्य माणसाची असामान्य वाटचाल
सांगली : वॉर्ड क्रमांक १४ मधून निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले सराफ कट्ट्यातील सुधाकर कस्तुरे हे नाव आज चर्चेत आहे. सराफ कट्ट्यातील दुकानांची झाडलोट, गाड्या स्वच्छ करणे, प्रत्येकाला नमस्कार करणे आणि कपाळावर टिळा—हिंदुत्वाचा वारसा जपत हा सामान्य माणूस निवडणूक लढवत आहे.
सुधाकर कस्तुरे यांच्या प्रामाणिक, भोळ्या स्वभावामुळे अनेक मतदारांनी स्वतःहून त्यांचे कौतुक केले आहे. इतकेच नव्हे तर सराफ कट्ट्यातील नागरिकांनी पॉपलेट व प्रचार साहित्याकरिता लोकवर्गणीतून मदत करण्याचा निर्णय घेतला असून, त्यामुळे त्यांच्या उत्साहाला नवी ताकद मिळाली आहे.
सामाजिक जाणिवेचे अनेक दाखले त्यांच्या कामातून दिसतात. गवळी गल्ली येथे गाढवाचे पिल्लू मृत अवस्थेत पडले असताना एकही नगरसेवक पुढे न आल्यावर सुधाकर कस्तुरे यांनी स्वतः सायकलवरून ते नदीकाठी नेऊन खड्डा करून पुरले. जैन बस्ती व गवळी गल्लीतील काही रस्त्यांचे काम प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा करून पूर्ण करून घेतले.
श्रावण महिन्यात व महाशिवरात्रीला घरोगरी बेलपत्र वाटून, विशेषतः महिला वर्गात त्यांनी आपली वेगळी ओळख निर्माण केली. प्रत्येक महाप्रसाद, सामाजिक कार्यक्रमात त्यांचा सक्रिय सहभाग असतो. अत्यंत गरीब असूनही रात्री-अपरात्री कुणीही मदत मागितली तर ते हजर असतात.
वॉर्डमधील कोणतेही काम असो, स्वतः महापालिकेत फेऱ्या मारून ते पूर्ण करून घेण्याची त्यांची जिद्द आहे. सराफ कट्ट्यातील पेंडुरकर पेढीत दुकान झाडणे, गाड्या धुणे अशी कामे करून ते आपला उदरनिर्वाह करतात. गवळी गल्ली व जैन बस्तीतील रस्ते सिमेंटचे करून घेणे, अंबाबाई बोळ व रामनगर येथील बंद पडलेले पथदिवे सुरू करून घेणे—काम पूर्ण होईपर्यंत प्रशासनाच्या मागे लागणे हीच त्यांची कार्यपद्धत आहे. गाडी किंवा मोबाईल नसतानाही सायकलने फिरून कामे मार्गी लावली जातात.
कोणाच्याही घरी मयत झाले तर हजर राहणे, साहित्य आणणे आणि अंत्यसंस्कार पूर्ण होईपर्यंत पुढाकार घेणे—या माणुसकीमुळेच पेठ भागातील नागरिकांनी वर्गणी काढून डिपॉझिट भरले, पांपलेट छापले व इतर खर्च उचलला आहे.
असा हा सामान्य, गरीब पण मनाने श्रीमंत उमेदवार आज लोकांच्या विश्वासावर लढाईत उतरला आहे.

Post a Comment

Previous Post Next Post