वसंतदादा शेतकरी सहकारी साखर कारखाना लि., सांगली कारखान्याची गाळप क्षमता व डिस्टीलरीची क्षमतेमध्ये वाढ करण्याचा निर्णय काल झालेल्या कारखान्याच्या विशेष सर्व साधारण सभेत घेणेत आला.
वसंतदादा शेतकरी सहकारी साखर कारखाना लि., सांगली कारखान्याची अधिमंडळाची विशेष सर्व साधारण सभा कारखाना कार्यस्थळावरील सभागृहात घेणेत आली होती. प्रथमतः दिपप्रज्वलन करुन सभेच्या कामकाजास सुरुवात झाली. कारखान्याचे चेअरमन काही अपरिहार्य कारणास्तव सभेस उपस्थित नसल्याने सभेच्या अध्यक्षस्थानी कारखान्याचे उपाध्यक्ष बाळासाहेब दादासाहेब पाटील यांनी अध्यक्षस्थान स्विकारले त्यास सुचक म्हणून अॅड गजानन खुजट तर अनुमोदक म्हणून अंजुम महात यांनी दिले.
खासदार विशाल पाटील यांच्या समर्थ नेतृत्वाखाली कारखाना आर्थिक अडचणीतून बाहेर पडुन यशस्वी वाटचाल करीत आहे. सांगली जिल्ह्यात ताकारी- म्हैसाळ, आरफळ योजनेचे पाणी सर्वत्र फिरले असलेने ऊसाचे क्षेत्रात खुप प्रमाणात वाढ झालेली आहे. शेतकऱ्यांच्या ऊसाचे गाळप त्या-त्या वर्षी व्हावे व शेतकऱ्यांचे ऊस शिल्लक राहून नुकसान होवू नये म्हणून गाळप क्षमतेमध्ये वाढ होणे अपेक्षित आहे. सध्याची गाळप क्षमता 7500 टन प्रतीदिनी आहे, ती वाढ करुन 15000 टन प्रतीदिनी करण्याचा निर्णय घेणेत आला आहे. कारखान्याची गाळप क्षमता वाढल्याने मोलॅसिसमध्येही वाढ होणार आहे हे लक्षात घेता डिस्टीलरीची क्षमता ही प्रतीदिनी 90 KLPD वरुन 150 KLPD पर्यंत नेण्याचा निर्णयही घेण्यात आला.
श्री. दत्त इंडिया प्रा.लि., कंपनीचा कार्यकाल संपल्यानंतर कारखाना चालविताना पूर्वी जो 150-160 दिवस चालविला जात होता. त्या ऐवजी 90 ते 130 दिवसात पूर्ण गाळप करुन जास्तीत जास्त रिकव्हरी प्राप्त करण्याचा विचार केला जाईल. जो कारखाना पूर्वी सांगली शहराच्या बाहेर होता तो आता शहराच्या मध्यभागी आलेला आहे. त्यामुळे जमिनीच्या किंमतीतही वाढ झाली आहे. कारखान्याचे संचालक मंडळयाने याकरिता कारखाना जमिनीचे मुल्याकंन करुन घेतले आहे. त्यामुळे कारखान्याची कर्ज घेणेची क्षमता वाढणार आहे. कार्यकारी संचालक श्री. संजय पाटील यांनी कारखाना गाळप क्षमता वाढ करणे व प्राप्त झालेला मुल्यांकन अहवाल याअनुषंगाने मांडलेल्या ठरावास सर्व सभासदांनी उस्फुर्तपणे पाठिंबा दिला.
सदर सभा खेळीमेळीत पार पडली. यावेळी सभासद बजरंग पाटील, बाळासो सुर्यवंशी, प्रदिप शिंदे, संभाजी जाधव, बाळासो दरवंदर, प्रभाकर पाटील आदिनी प्रश्न विचारले. तसेच सभेचे नोटीस वाचन कार्यकारी संचालक श्री. संजय पाटील यांनी केले तसेच आभार संचालक अमित पाटील यांनी मानले. सभेसाठी संचालक युवा नेते हर्षवर्धन पाटील, यशवंतराव पाटील, गणपतराव पाटील, विशाल चौगुले, अॅड. खुजट, दिनकर सांळुखे, संजय पाटील, ऋतुराज सुर्यवंशी, अंकुश पाटील, उमेश मोहिते, सुमित्रा खोत, अंजुम महात, प्रल्हाद गडदे, शिवाजी कदम, तानाजी पाटील, व्ही. एम. कुंभार आदि उपस्थित होते. सुत्रसंचालन श्री. विजय कडणे यांनी केले.
Tags
सांगली प्रतिनिधी