इस्लामपूर : प्रतिनिधी
शिगावला दरवर्षी महापुराचा तडाखा बसतो. ६० टक्क्यांपेक्षा जास्त भाग पाण्याखाली जातो. शेतीचे, घराचे मोठे नुकसान होते. येथील ग्रामस्थांनी ३० वर्षांपासून पुनवर्सनाची मागणी लावून धरली आहे. परंतु अकार्यक्षम आमदारांना तो प्रश्न सोडवता आलेला नाही, असा आरोप इस्लामपूर विधानसभा मतदार संघाचे महायुतीचे उमेदवार निशिकांत भोसले-पाटील (दादा) यांनी केला.
इस्लामपूर विधानसभा मतदार संघातील शिगाव येथे प्रचार सभे दरम्यान ते बोलत होते. यावेळी प्रसाद पाटील, सागर खोत, सागर मलगुंडे, निवास पाटील, विष्णुपंत चव्हाण, हंबीरराव पाटील, चंद्रकांत देसाई, प्रताप पाटील, अरुण गावडे, सनी अहिर प्रमुख उपस्थित होते.
निशिकांत भोसले-पाटील (दादा) म्हणाले, शिगाव गाव हे क्रांतिकारकांच गाव म्हणून सर्वत्र परिचित आहे. आताही या गावाला क्रांती घडवायची आहे. ज्याला तुम्ही ३५ वर्षे झाली निवडून देताय व सोसताय त्या माणसाने तुमच्यासाठी काय केलं, असा माझा तुम्हाला प्रश्न आहे. तुमची ३० वर्षांपासून पुनर्वसनाची मागणी आहे. ती त्यांना पूर्ण करता आली नाही. येथील समाज मंदिराचा प्रश्न जैसे थे आहे. प्राॅपर्टी कार्ड विषय सुटलेला नाही. मूलभूत प्रश्न त्यांनी सोडवले नाहीत. आजपर्यंत तुम्ही त्यांना प्रत्येक निवडणुकीत लीड देता आणि येथे प्रचाराला आल्यावर हलगी वाजवून स्वागत करता, काय म्हणावं तुम्हाला. ज्या शिगाव गावच्या पुत्राने देशासाठी बलिदान दिले. गावाचे नाव देशभर केलं. त्या येथील वीर जवान रोमित चव्हाण यांचे स्मारक त्यांना उभा करता आलं नाही, हे या गावचे दुर्देव आहे. हा तालुका क्रांतिकारकांचा आहे. विरोधकांनी गावा-गावात गट-तट करण्यापेक्षा पुढील पिढीला या महापुरुषांचे कार्य कळावे व त्यांचा आदर्श घेता यावा, यासाठी त्यांनी स्मारके बनवायला हवी होती. ऊसाच्या बाबतीत आता मी काही बोलायची गरज नाही. कारण तुमचे ७०० रुपये कोण मारतय, हे सर्वांना समजलं आहे. या निवडणुकीत मला आशिर्वाद द्या. निवडून आल्यानंतर तुमचे अनेक वर्षांचे प्रलंबित प्रश्न मार्गी लावीन, हे मी यानिमित्त तुम्हाला वचन देतो.
यावेळी शिवाजी खोत, राहुल पाटील, संजय गोसावी, राजेंद्र पाटील, ओंकार नलवडे यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते, मतदार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
छातीचा कोट करून पुढे असेन...
येथील पाणंद रस्त्याची वर्क ऑर्डर निघून अनेक दिवस झाले. पण गावातील काही मंडळींनी त्यात आडकाठी आणली. आता तर निवडणुकीच्या तोंडावर ती मंडळी आमच्या कार्यकर्त्यांना त्रास देत आहेत. पण मी त्यांना सांगेन हा निवास पाटील छातीचा कोट करेल, पण कार्यकर्त्यांच्या केसाला धक्का लागून देणार नाही. याच गावच्या बाभळी आणि याच गावची बोरी आहेत. त्यामुळे संबधित मंडळींनी कार्यकर्त्यांना त्रास देताना विचार करावा, असा इशारा ही निवास पाटील यांनी यावेळी दिला.
Tags
इस्लामपूर प्रतिनिधी