इस्लामपूर : प्रतिनिधी
सांगली जिल्हयातील अनेक कारखानदार गेल्या वर्षी ३ हजार ४०० रुपये दर देण्यास तयार होते. परंतु इस्लामपूरच्या एका माणसाने त्यांना असले काही करू नका, नाहीतर शेतकरी डोक्यावर चढून बसतील, असे सांगितले. तो माणूस तेवढ्यावरच थांबला नाही. तर त्याने कोल्हापूर जिल्ह्यातील एका कारखानदाराला फोन करून तुम्ही तिकडे तेवढा दर देऊ नका. नाहीतर आम्हाला सांगली जिल्हयातही तेवढा दर द्यावा लागेल, असे सांगून त्यांचे कान भरले. त्यामुळे ऊस दरामध्ये आडकाठी आणून ऊस उत्पादकांच्या आडवे जाणाऱ्यांना येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत तुम्ही धडा शिकवा, असे आवाहन माजी खासदार राजू शेट्टी यांनी केले.
समडोळी (ता.मिरज) येथे माजी खासदार राजू शेट्टी यांच्या विशेष प्रयत्नातून मिळालेल्या ६० लाख तर निशिकांत भोसले-पाटील (दादा) यांच्या विशेष प्रयत्नातून मिळालेल्या १ कोटी ३९ लाख, असे एकूण १ कोटी ९९ लाख रुपये निधीतून केल्या जाणाऱ्या विविध विकास कामांच्या उदघाटन प्रसंगी ते बोलत होते. भाजपाचे जिल्हाध्यक्ष निशिकांत भोसले-पाटील (दादा) हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. यावेळी स्वाभिमानी संघटनेचे युवा अध्यक्ष संजय बेले, जेष्ठ नेते बाळासाहेब वग्याणी, दीपक मगदूम, भाजपा इस्लामपूर विधानसभा संयोजक प्रसाद पाटील, जिल्हा उपाध्यक्ष धैर्यशील मोरे, तालुकाध्यक्ष निवास पाटील, युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष चंद्रकांत पाटील, संघटन सरचिटणीस संदीप सावंत प्रमुख उपस्थित होते.
राजू शेट्टी म्हणाले, निशिकांत भोसले- पाटील कोणत्या पक्षात आहेत, याच्याशी माझे देणे-घेणे नाही. मी त्यांच्या पक्षाच्या कायम विरोधात असतो. परंतु माणूस म्हणून त्यांना सर्टिफिकेट देण्याची गरज आहे. कारण मी कोरोना काळात त्याचा अनुभव घेतलाय. कोण माणूस रस्त्यावर येत न्हवता. त्या काळात ते नगराध्यक्ष होते. त्यांनी धाडस करून लोकांना सुविधा दिल्या व मदत केली. परंतु काही लोकांनी त्यांच्या हॉस्पिटलची चौकशी लावली. परंतु त्या चौकशीत काहीतरी निघायला हवं होतं. काचेच्या घरात राहणाऱ्यांनी दुसऱ्याच्या घरावर दगडे मारायचा प्रयत्न करू नये, असे मला वाटते. कारण फुटलेल्या काचेचा तुकडा आपल्या अंगावर येतो आणि आपण रक्तबंबाळ झाल्याशिवाय राहत नाही.
निशिकांत भोसले-पाटील (दादा) म्हणाले, येथील विद्यमान आमदारांच्या हाती गेले ३५ वर्षे तुम्ही एकहाती सत्ता दिली आहे. परंतु त्यांना मतदार संघाचा विकास साधता आला नाही. जनतेचे पायाभूत प्रश्न सोडवण्यासाठी या नेतृत्वाने कधी ही पुढाकार घेतला नाही. उलट राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर त्यांनी इस्लामपूर विधानसभा मतदार संघात विकास कामांसाठी आलेला मंजूर निधी आढवला. अनेक चालू विकासकामांना खीळ घातली. विरोधकांना निस्तनामुद करण्यासाठी त्यांनी सत्तेचा दुरुउपयोग केला. त्यामुळे येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत विकासकामांना खीळ घालणाऱ्या या आमदारांना त्यांची योग्य जागा दाखवा.
यावेळी देविकाताई पाटील, अनिताताई मस्कर, वैशालीताई मगदूम, संगीताताई कोळी, किशोरीताई कोळी, दस्तगिर मुजावर, सुकुमार खोत, प्रवीण पाटील, ऍड.सचिन रुघे, राजकुमार पाटील, अभिजित पाटील, राहुल कोळी, काशीम मुजावर, अरुण कोळी, सागर पाटील, संतोष ढोले, अभिजित कांबळे, विनोद बेले, प्रमोद शेंडगे यांच्यासह परिवर्तन विकास आघाडीचे सर्व कार्यकर्ते व स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पदाधिकारी, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
जनतेला चांगल्या सुविधा देण्याचा प्रयत्न निशिकांतदादा करतील...
यावेळी बोलताना राजू शेट्टी म्हणाले, आम्ही राज्य सरकारला कररूपी कोट्यवधी रुपयांचा निधी देत असतो. त्या बदल्यात आम्हाला राज्यकर्त्यांकडून चांगल्या सुविधा मिळाव्यात ही आमची अपेक्षा अवास्तव नाही. परंतु त्या मिळवून देण्याची जबाबदारी त्या-त्या मतदार संघातील लोकप्रतिनिधींची असते. परंतु येथील लोकप्रतिनिधी ते देण्यात अपयशी ठरले आहेत. परंतु मला खात्री आहे की, ते काम भविष्यामध्ये निशिकांतदादा करतील.
.
Tags
इस्लामपूर प्रतिनिधी