पै. मारुती माने यांचे स्मारक लवकरच पूर्ण होईल -निशिकांत भोसले-पाटील

इस्लामपूर : प्रतिनिधी
     आंतरराष्ट्रीय कुस्तीपटू हिंदकेसरी पैलवान मारुती माने (भाऊ) यांच्या कवठेपिरान (ता. मिरज) येथील स्मारकासाठी नव्याने स्मारक समितीची पुनर्ररचना करण्यात आली आहे. या समितीची बैठक होऊन स्मारकाचे अपूर्ण कामे तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना समितीने संबधीत प्रशासनाला दिल्या आहेत. गुणवत्तापूर्ण व दर्जेदार असे स्मारकाचे काम लवकरच पूर्ण होईल, अशी माहिती भाजपाचे जिल्हाध्यक्ष निशिकांत भोसले-पाटील (दादा) यांनी पत्रकार बैठकीत दिली. 

यावेळी माजी जि.प.सदस्य पै. भीमराव माने, भाजपाचे प्रदेश सदस्य व इस्लामपूर विधानसभा संयोजक प्रसाद पाटील, जिल्हा उपाध्यक्ष धैर्यशील पाटील, तालुकाध्यक्ष निवास पाटील, शहर अध्यक्ष अशोकराव खोत प्रमुख उपस्थित होते.

निशिकांत भोसले-पाटील (दादा) म्हणाले, सात वर्षांपूर्वी भूमिपूजन झाल्यानंतरही निधीच्या रडगाण्यामुळे स्मारकाचे काम अद्याप पूर्णत्वास गेले नाही. त्यामुळे कुस्तीला खऱ्या अर्थाने न्याय देणाऱ्या हिंदकेसरींच्या स्मारकास उदासीन विद्यमान लोकप्रतिनिधींमुळे न्याय मिळणार तरी कधी, असा सवाल उपस्थित केला जात होता. तरीही त्यांनी या कामी दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे स्मारकाचे काम पूर्ण व्हावे, यासाठी आम्ही आता पाठपुरावा करून नव्याने स्मारक समितीची पुनर्ररचना केली आहे. त्यामुळे लवकरच स्मारकाचे काम मार्गी लागून पूर्ण होईल.

पै.भीमराव माने म्हणाले, पै.मारुती माने यांचे २०१० मध्ये निधन झाले. देशातच नव्हे, तर परदेशातही ताकद व कुस्तीकौशल्याच्या जोरावर ‘कुस्तीतला महाबली’ म्हणून बिरुदावली मिळालेल्या हिंदकेसरी पै. माने यांचे कार्यकर्तृत्व भावी पिढ्यांना कळावे, म्हणून आम्ही मागणी न करता शासनाने स्मारक मंजूर केले. तत्कालीन पालकमंत्री स्व.पतंगराव कदम, मंत्री स्व.आर.आर. पाटील, जयंत पाटील आदींसह जुन्या काळातील मल्ल, कुस्तीप्रेमींच्या साक्षीने २०१६ मध्ये स्मारकाचे भूमिपूजन झाले होते. त्यानंतर उदासीन लोकप्रतिनिधींमुळे निधीअभावी कामे रखडली आहेत. आता पालकमंत्री सुरेश खाडे व निशिकांत भोसले-पाटील (दादा) यांच्या पाठपुराव्यामुळे हे काम मार्गी लागत आहे. सरकारने स्मारक बांधकामासाठी १५ सदस्यांची समिती गठित केली आहे. पालकमंत्री सुरेश खाडे हे समितीचे प्रमुख आहेत. तर पै.आनंदराव पवार, पै.विठ्ठल पाटील हे उपसमिती प्रमुख आहेत. तसेच पै.नामदेव मोहिते, माजी आ.पै.दिनकर पाटील, हिंदकेसरी पै. दीनानाथ सिंग, निशिकांत भोसले-पाटील, पै. भीमराव माने, पै.पृथ्वीराज पवार, पै. रघुनाथ दिंडे, जि.प.सांगलीचे मुख्य कार्यकारी अधिकारी, सार्वजनिक बांधकाम विभाग कोल्हापूरचे मुख्य अभियंता, पोलीस अधीक्षक, सांगली, क्रीडा उपसंचालक, कोल्हापूर, जिल्हाधिकारी सांगली, हे समितीतील सदस्य आहेत. बांधकामासाठी लागणाऱ्या सुमारे ४ कोटी ९० लाख पैकी सुमारे ४ कोटी ९ लाख रुपये निधी प्राप्त आहे. मुख्य इमारतीचे बांधकाम पूर्ण झाले आहे. पुतळ्यात काही त्रुटी आहेत. त्या दूर करण्यात येणार आहेत. तसेच सर्व कामे महिनाभरात पूर्ण करून स्मारक समितीकडे दि. १२ ऑक्टोबरपर्यंत हस्तांतरित करण्यात येणार आहे. हिंदकेसरी भाऊंच्या नावाला शोभेल असे दर्जेदार स्मारक लवकरच पूर्ण होईल. हे काम मार्गी लावल्याबद्दल पालकमंत्री सुरेश खाडे व निशिकांत भोसले-पाटील यांचे मी कवठेपिराण ग्रामस्थांतर्फे आभार मानतो.

यावेळी युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष चंद्रकांत पाटील, तालुका उपाध्यक्ष प्रा.दत्तात्रय पाटील, गजानन पाटील, भास्कर मोरे, सरचिटणीस संदीप सावंत, यदुराज थोरात, रणजित माने, अनिल आवटी, दादासाहेब रसाळ, निशिकांतदादा युथ फाऊंडेशनचे अध्यक्ष अक्षय भोसले-पाटील, निशिकांतदादा स्पोर्ट्स फाऊंडेशनचे अध्यक्ष अजित पाटील यांच्यासह भाजपा पदाधिकारी उपस्थित होते.

स्मारकामधील प्रस्तावित कामांसाठी १५ कोटींचा प्रस्ताव...
     स्मारकामध्ये मुख्य इमारतीसह प्रवेश गॅलरी, हिंदकेसरी पै. मारुती माने (भाऊ) यांचा पुतळा, म्युझिअम, रेस्टलिंग प्रेक्टिस हॉल, स्वच्छता गृह, अंतर्गत रस्ते, कुंपण भिंत, प्रवेशद्वार आदी कामे प्रस्तावित करण्यात आली आहेत. त्यासाठी समितीने नव्याने १५ कोटी रुपयांचा प्रस्ताव मंजूर करून देण्यात आला आहे. त्यामुळे लवकरच निधी मंजूर होऊन ही कामे मार्गी लागतील, असेही पै. भीमराव माने यांनी सांगितले.


Post a Comment

Previous Post Next Post