इस्लामपुरात प्रकाश मेडिकल कॉलेजतर्फे कँडल मार्च कोलकाता येथील निवासी डॉक्टर अत्याचार प्रकरणाचा निषेध : डॉक्टरांच्या सुरक्षेच्या दृष्टीने उपाययोजना करण्याची मागणी

 


कोलकाता येथील निवासी डॉक्टर अत्याचार प्रकरणाचा निषेध : डॉक्टरांच्या सुरक्षेच्या दृष्टीने उपाययोजना करण्याची मागणी


इस्लामपूर : प्रतिनिधी

    इस्लामपूर येथील प्रकाश मेडिकल कॉलेज अँड रिसर्च सेंटरमध्ये कोलकता येथे एका निवासी डॉक्टरवर अत्याचार करून हत्या करणाऱ्या नराधमांवर कठोरात कठोर शिक्षा करावी, त्याचबरोबर डॉक्टरांवर होणारे हल्ले पाहता डॉक्टरांच्या सुरक्षिततेसाठी उपाययोजना कराव्यात, या घटनेच्या निषेधार्थ कँडल मार्च काढण्यात आला. 


वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये केवळ वैद्यकीय शिक्षणच नव्हे, त्यासोबत रुग्णसेवाही दिली जाते. अपघात, विविध शस्त्रक्रिया, प्रसुत्या यासह बाह्यरूगविभागात मोठ्या संख्येने रुग्ण दाखल होऊन उपचार घेतात. वैद्यकीय महाविद्यालयातील आरोग्य सेवेचा कणा म्हणून निवासी डॉक्टरांकडे पाहिले जाते. दरम्यान, मागील काही वर्षांपासून निवासी डॉक्टरांवर हल्ले होण्याचे प्रमाण वाढले आहे. डॉक्टरांना संरक्षण देण्याची मागणी वारंवार करूनही निवासी डॉक्टरांवर होणारे हल्ल्याचे प्रमाण काही केल्या थांबत नाही. दरम्यान, नुकतेच कोलकाता येथील आर. जी. कार मेडिकल कॉलेजमधील निवासी डॉक्टरवर अत्याचार करून हत्या केल्याची निंदनीय घटना घडली आहे. या घटनेनंतर निवासी डॉक्टरांमध्ये तीव्र संतापाची लाट निर्माण झाली आहे. या घटनेच्या निषेधार्थ इस्लामपूर येथील प्रकाश मेडिकल कॉलेज अँड रिसर्च सेंटरमध्ये मंगळवारी संध्याकाळी ७ वाजता कँडल मार्च काढून अत्याचार घटनेचा निषेध करण्यात आला.


यावेळी प्रकाश मेडिकल कॉलेज अँड रिसर्च सेंटरच्या प्राचार्या डॉ.रोहिणी करंबेळकर म्हणाल्या, आरोपीविरोधात जलदगती न्यायालयात प्रकरण चालवावे, यासाठी समिती स्थापन करून पारदर्शकपणे काम करत कठोरात कठोर शिक्षा देण्यात यावी. याशिवाय सेंट्रल हेल्थकेअर प्रोटेक्शन ॲक्टची अंमलबजावणी वाढविण्यासाठी तज्ञ समितीची स्थापना करावी. आरोग्यसेवा कामगारांच्या चांगल्या सुरक्षेसाठी पूर्ण कार्यात्मक सुसज्ज सीसीटीव्ही आणि रक्षकांसह सुरक्षा उपाययोजना करावी.


यावेळी कॅम्पस डायरेक्टर डॉ.विजयकुमार पाटील, डॉ.ज्योस्त्ना वडेर, विद्यार्थी सचिव कु. विष्णू ठाकूर, सम्राघी चक्रवर्ती,ओम गुंडेवार, ऋषी  केदार, पार्थ सूचक, सोहन रांजवन, नियंता पंत यांच्यासह सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते..


 नराधमाला कठोर शिक्षा करा..

      निवासी डॉक्टरवर अत्याचार करून हत्या करणाऱ्या नराधमाला कठोर शिक्षा करावी. हे प्रकरण जलदगती न्यायालयात चालवावे. याशिवाय डॉक्टरांच्या सुरक्षिततेसाठी उपाययोजना करण्यात याव्यात, अशी मागणी यावेळी एल.आर.पी.आयुर्वेदिक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.अभिमन्यू पाटील यांनी केली.

Post a Comment

Previous Post Next Post