शाहिरी प्रशिक्षण शिबिरास उदंड प्रतिसाद

 


सांगली | प्रतिनिधी
महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने आयोजित करण्यात आलेले राज्यस्तरीय शाहिरी प्रशिक्षण शिबिर सध्या सांगली येथील कालिका मंदिर हॉलमध्ये उत्साहात सुरू आहे. शाहिरी परंपरेचे जतन व संवर्धन व्हावे, या उद्देशाने हे दहा दिवसीय शिबिर आयोजित करण्यात आले असून त्याला रसिक व प्रशिक्षणार्थींकडून उदंड प्रतिसाद मिळत आहे.
या शिबिराचे संचालक आंतरराष्ट्रीय कीर्तीचे शाहीर सम्राट डॉ. देवानंद माळी असून, एकूण तीस युवक-युवती या शिबिरात सहभागी झाले आहेत. या प्रशिक्षण शिबिरासाठी महाराष्ट्रातील ख्यातनाम शाहीर मार्गदर्शक म्हणून राष्ट्रीय शाहीर राष्ट्रपती पुरस्कारप्राप्त बजरंग आंबी, शाहीरा अनिता खरात चिचंणीकर, शाहीर अजिंक्य लिंगायत (संभाजीनगर), शाहीर मोहन यादव, युवा शाहीर पृथ्वीराज माळी तसेच शाहीरा कल्पना माळी यांचे मार्गदर्शन लाभत आहे.
शिबिरामध्ये शाहिरी पोवाडा गायन, शाहीरी फटका, लोकगीते, समूहगान यांसह डफ, दिमडी, तुणतुणे, सांबळ आदी लोकवाद्यांचे सखोल प्रशिक्षण दिले जात आहे. या शिबिरात प्रशिक्षण घेण्यासाठी महाराष्ट्रातील सातारा, कोल्हापूर, धाराशिव, पलूस, बांबवडे, मिरज येथील तसेच कर्नाटकातील बेळगाव येथील विद्यार्थी सहभागी झाले आहेत.
हे शिबिर निवास व विनामूल्य असल्याने प्रशिक्षणार्थींमध्ये विशेष उत्साह दिसून येत आहे. शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी सांस्कृतिक कार्य विभागाचे संचालक आदरणीय विबीषण चवरे साहेब तसेच शिबिर संचालक शाहीर सम्राट डॉ. देवानंद माळी यांचे मार्गदर्शन लाभत आहे.
दरम्यान, या शाहिरी प्रशिक्षण शिबिराचा समारोप बुधवार, दि. २ जानेवारी रोजी सायंकाळी ठीक पाच वाजता होणार असून, या कार्यक्रमास ज्येष्ठ सिनेअभिनेते व निवेदक मा. विजय दादा कडणे हे प्रमुख उपस्थित राहणार आहेत. या समारोप कार्यक्रमास नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे जाहीर आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post