शक्तिप्रदर्शनाने प्रचाराची सांगता, नगराध्यक्ष पदासाठी 41 तर नगरसेवक पदासाठी 594 जणांचे भवितव्य ठरणार, प्रशासकीय यंत्रणा सज्ज, दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला
सांगली प्रतिनिधी
जिल्ह्यातील सहा नगरपालिका आणि दोन नगरपंचायतीच्या निवडणुकीसाठी सोमवारी प्रचाराच्या शेवटच्या दिवशी मंत्री, आमदारांच्या सभा, बैठका, पदयात्रा आणि रॅलीने जोरदार शक्तिप्रदर्शन करीत सांगता झाली. मंगळवारी सकाळी साडेसात ते सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत मतदान होणार असून प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली आहे. नगराध्यक्षपदाच्या आठ जागांसाठी 41 तर नगरसेवक पदाच्या 181 जागांसाठी 594 उमेदवार रिंगणात आहेत. आठ ठिकाणी 291 मतदान केंद्रावर 2 लाख 57 हजार 977 नागरिक मतदानाचा हक्क बजावतील. मतदान प्रक्रियेसाठी 1 हजार 780 कर्मचार्यांची नियुक्ती करण्यात आली असून अनुचित प्रकार घडू नये, यासाठी कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. नगरपालिका निवडणुकीच्या निमित्ताने आजी-माजी आमदारांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.
जिल्ह्यातील इस्लामपूर, आष्टा, तासगाव, विटा, जत आणि पलूस नगरपालिका तर शिराळा आणि आटपाडी नगरपंचायतीसाठी निवडणूक होत आहे. महायुती आणि महाविकास आघाडीने या निवडणुकीसाठी कंबर कसली आहे. निवडणुकीसाठी स्वतंत्र, बंडखोर, स्थानिक आघाड्या आणि प्रमुख पक्ष अशा सर्वांचीच समीकरणे गुंतागुंतीची बनली आहेत. अनेक नगरपालिकांमध्ये दुरंगी, तिरंगी आणि चौरंगी अशी लढत पहायला मिळत आहे. गेली आठ दिवसांपासून प्रचाराचा धुरळा उडाला. निवडणुकीच्या प्रचाराच्या शेवटच्या दिवशी पर्यावरण मंत्री पंकजा मुंढे यांच्यासह आजी, माजी आमदारांच्या विविध ठिकाणी सभा पार पडल्या. पदयात्रा, प्रचारफेरी, मोटरसायकल रॅलीसह सभा घेवून संध्याकाळी दहा वाजता प्रचाराची सांगता झाली.
सहा नगरपालिका आणि दोन नगरपंचयातमधील नगराध्यक्ष पदाच्या 8 जागांसाठी 41 उमेदवार रिंगणात आहेत. तर नगरसेवक पदाच्या 181 जागांसाठी 594 उमेदवार रिंगणात आहेत. मंगळवारी सकाळी साडेसात ते सायंकाळी साडेपाच या वेळेत मतदान होणार आहे. नगरपालिका आणि नगरपंचायतीसाठी 2 लाख 57 हजार 977 मतदार आहेत. मतदानासाठी 291 मतदान केंद्र आहेत. मतदान प्रक्रियेसाठी 1 हजार 780 अधिकारी आणि कर्मचार्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सर्व मतदान केंद्रात ज्येष्ठ नागरिक, गर्भवती महिला, दिव्यांग यांचा मतदानात सहभाग सुलभ व्हावा, यासाठी प्रशासनाने विविध सुविधा पुरविण्यात आल्या आहेत. व्होटर स्लीपांचे वाटप पूर्ण झाल्याचा दावा प्रशासनाने केला आहे.
मतदानावेळी कोणताही अनुचित प्रकार होऊ नये, यासाठी पुरेसा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. दरम्यान जिल्ह्यातील मतदान केंद्रावर कर्मचारी आणि ईव्हीएम मशीन पाठवण्यासाठी दिवसभर धावपळ सुरु होती. सायंकाळी सर्व मतदान केंद्रावर नियुक्त केलेल्या कर्मचार्यांसह मतदान यंत्रे पोहोच झाली असून प्रत्यक्षात मतदानाची तयारी पूर्ण झाली आहे.
नगरपालिका आणि नगरपंचायत निवडणुकीत महायुती आणि विरोधी महाविकास आघाडीमध्ये फूट पडली आहे. असे असले तरी महायुतीतील भाजप, अजितदादा राष्ट्रवादी काँग्रेस आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने ताकद पणाला लावली आहे. महाविकास आघाडीमध्ये शरदचंद्र पवार राष्ट्रवादीने इस्लामपूर, आष्टा, तासगाव तर काँग्रेसने पलूस आणि जतमध्ये मोठी ताकद आजमावण्याचा प्रयत्न केला आहे. जिल्ह्यातील आठ आमदारांपैकी सहा आमदारांच्या कार्यक्षेत्रात नगरपालिका आणि नगरपंचायती येतात. याशिवाय एक माजी खासदार आणि सात माजी आमदारांच्या बालेकिल्ल्यात या निवडणुका होत आहेत.
ईश्वरपूर व आष्टा नगरपालिकेसाठी शरदचंद्र पवार राष्ट्रवादीचे माजी प्रदेशाध्यक्ष व आ. जयंत पाटील यांच्यासमोर महायुतीकडून भाजपचे जिल्हाध्यक्ष सम्राट महाडीक, अजितदादा राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष निशिकांत पाटील, एकनाथ शिंदे सेनेचे जिल्हाध्यक्ष आनंदराव पवार यांनी आव्हान निर्माण केले आहे. आष्ट्यात राष्ट्रवादीकडून आष्टा शहर विकास आघाडी विरोधात अजितदादा राष्ट्रवादी, भाजप आणि शिवसेना अशी लढत आहे. जत नगरपालिकेत तिरंगी लढत होत आहे. काँग्रेसचे माजी आ. विक्रमसिंह सावंत विरोधात भाजपचे आ. गोपीचंद पडळकर आणि अजितदादा राष्ट्रवादीचे नेते माजी आ. विलासराव जगताप यांनी राष्ट्रवादीचे पॅनेल उभे आहे. येथे अत्यंत चुरशीने आणि तणावाच्या वातावरणात निवडणूक होत असल्याचे स्पष्ट झाले.
विटा नगरपरिषदेसाठी शिंदे सेनेचे आमदार सुहास बाबर यांच्या विरोधात भाजपचे नेते माजी आ. सदाशिवराव पाटील, माजी नगराध्यक्ष वैभव पाटील यांच्या गटात जोरदार लढत होत आहे. तासगावला चौरंगी लढत होत आहे. शरदचंद्र पवार राष्ट्रवादीचे आमदार रोहित पाटील विरोधात माजी खा. संजयकाका पाटील यांची आघाडी, स्वप्निल पाटील यांचे भाजप पॅनेल, अजितदादा राष्ट्रवादी काँग्रेस पॅनेल अशी लढत आहे. पलूस नगरपालिकेतही तिरंगी लढत होत आहे. काँग्रेसचे माजी मंत्री आ. डॉ. विश्वजीत कदम यांनी काँगे्रसचे पॅनेल आहे. त्याविरोधात माजी आ. पृथ्वीराज देशमुख यांचे भाजप आणि अजितदादा राष्ट्रवादी काँग्रेसचे निलेश येसुगडे यांनी राष्ट्रवादीचे पॅनेल उभे असल्याने चुरशीने लढत होत आहे.
शिराळा नगरपंचायतसाठी शरदचंद्र पवार आणि अजितदादा राष्ट्रवादी काँगे्रस एकत्र लढत आहे. जिल्हा बँकेचे अध्यक्ष व माजी आ. मानसिंगराव नाईक, माजी आ. शिवाजीराव नाईक यांनी एकत्र येवून घड्याळाच्या चिन्हावर उमेदवार उभे केले आहेत. त्यांच्याविरोधात आ. सत्यजित देशमुख, भाजप जिल्हाध्यक्ष सम्राट महाडीक यांचे भाजप-शिंदे शिवसेनेचे पॅनेलमध्ये लढत आहे. आटपाडी नगरपंचायतमध्ये शिंदे सेनेचे आ. सुहास बाबर, जिल्हा बँकेचे संचालक तानाजी पाटील यांच्या पॅनेल विरोधात भाजपकडून आ. पडळकर व जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख यांचे याशिवाय माजी आ. राजेंद्रअण्णा देशमुख यांचेही स्वतंत्र पॅनेल मैदानात आहे. नगरपालिका आणि नगरपंचायतीची निवडणुकीत आजी-माजी आमदारांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.
Tags
सांगली प्रतिनिधी