सांगली ः कोयना धरणातील विसर्ग आणि सुरु असलेला संततधार पाऊस यामुळे कृष्णा नदीची पाणी पातळी ४० फुटांवर जाईल, अशी शक्यता आहे. त्यामुळे नदीकाठी असलेल्या लोकांना घर सोडावे लागेल. त्याहून अधिक पातळी वाढली तर मोठ्या प्रमाणात स्थलांतर करावे लागेल. त्यासाठी आमची पूर्ण यंत्रणा सोबतीला असेल, अशा शब्दांत भाजपचे नेते पृथ्वीराज पाटील यांनी आज कृष्णाकाठी नागरिकांना दिलासा दिला.
कृष्णा नदीची पाणी पातळी वाढत असल्याने कृष्णाकाठी अस्वस्थता आहे. त्या पार्श्वभूमीवर श्री. पाटील यांनी आज सायंकाळी मगरमच्छ कॉलनी, सूर्यवंशी प्लॉट, आरवाडे प्लॉट यांसह पुराचे पाणी जिथे पहिल्यांदा येते त्या ठिकाणी जावून नागरिकांशी संवाद साधला. पृथ्वीराज पाटील फाउंडेशनच्यावतीने पूरग्रस्त भागात मातीसाठी टीम सज्ज असून चिंता नसावी, असे त्यांना आश्वस्त केले. या स्थितीसाठी २०१९ आणि २०२१ प्रमाणे सर्व तयारी कार्यकर्त्यांनी ठेवावी, ज्याला गरज आहे त्याच्यापर्यंत मदत पोहचली पाहिजे, अशा सूचना दिल्या.
फाउंडेशनचे अध्यक्ष बिपिन कदम, शितल सदलगे, मयुरेश पेडणेकर, अजिंक्य जाधव, प्रशांत अहिवळे, मनोज लांडगे, योगेश राणे, व सदस्य उपस्थित होते. पृथ्वीराज पाटील यांनी नागरिकांना सुरक्षित राहण्याचे आवाहन केले. पाणी ४० फुटापर्यंत वाढण्याची शक्यता असल्याने सुरक्षित स्थळी स्थलांतरित व्हावे, अशी विनंती केली.
Tags
सांगली प्रतिनिधी