लातूर (विशेष प्रतिनिधी):
लातूरच्या मातीतून साकारलेली एक प्रतिभावान, संवेदनशील आणि साहित्यिक जाणीवांची सखोल जाण असलेली कवयित्री प्रा. दर्शना देशमुख यांना “राष्ट्रीय नारी शक्ति पुरस्कार” जाहीर झाला असून, या अभिमानास्पद क्षणी लातूरचे माजी खासदार डॉ. सुनील बळीराम गायकवाड यांनी त्यांचा विशेष सत्कार करून त्यांना मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.
मुंबई येथे पार पडत असलेल्या अखिल भारतीय प्रतिभा सन्मान महासमेलन २०२५ या राष्ट्रीय स्तरावरील कार्यक्रमात प्रा. दर्शना देशमुख यांचा यथोचित गौरव करण्यात येणार आहे.त्यांच्या लेखणीतून व्यक्त होणारी नारीची वेदना, तिचं सामर्थ्य, आणि समाजातील तिचं स्थान याचं दर्शन घडवणारी कविता ही आजच्या पिढीसाठी एक प्रेरणास्थान बनली आहे.
डॉ. गायकवाड यांनी त्यांच्या सत्कारप्रसंगी सांगितले, “प्रा. दर्शना देशमुख यांचं कार्य हे केवळ साहित्यापुरतं मर्यादित नाही, तर त्यांनी महिलांच्या हक्कासाठी, आत्मभानासाठी आणि सामाजिक परिवर्तनासाठीही नेहमीच लेखणीचा प्रभावी वापर केला आहे. अशा गुणवंत स्त्रीला राष्ट्रीय सन्मान मिळणं, हे संपूर्ण लातूर जिल्ह्यासाठी अभिमानास्पद आहे.”
प्रा. देशमुख यांनीही आपल्या भावना व्यक्त करताना नम्र शब्दात सांगितले, “ही केवळ माझी नव्हे, तर त्या प्रत्येक स्त्रीची मान्यता आहे जिने जीवनाशी झुंज देत आपल्या अस्तित्वाला कवितेत, शब्दांत आणि विचारांत स्थान दिलं आहे. हा पुरस्कार मला पुढील वाटचालीसाठी नवी ऊर्जा आणि जबाबदारी देतो.”
त्यांच्या सन्मानाने संपूर्ण लातूर साहित्यिक आणि शैक्षणिक वर्तुळात आनंदाची लहर उसळली असून, त्यांच्या भावपूर्ण लेखनाने अनेकांच्या मनात घर केले आहे. प्रा. दर्शना देशमुख यांचा हा गौरव म्हणजे साहित्य, संस्कृती आणि नारीशक्तीच्या संगमाचं जिवंत उदाहरण आहे.
Tags
लातूर प्रतिनिधी