भाजपा युवा मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष प्रतापसिंह चव्हाण (सत्तूआण्णा) व नरेंद्र करंजूसकर यांच्यासह शिराळा मतदार संघातील सुमारे 250 युवक कार्यकर्त्यांसह भाजपला रामराम ठोकूण राष्ट्रवादी काँग्रसमध्ये जाहिर प्रवेश केला. महाविकास आघाडीचे आ. मानसिंगराव नाईक यांनी भाजपा युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष प्रतापसिंह चव्हाण व कार्यकर्त्यांचे राष्ट्रवादीत काँग्रेस पक्षात स्वागत करून सत्कार केला. प्रतापसिंह चव्हाण म्हणाले, उमेदवार आ. मानसिंगराव नाईक व माजी राज्यमंत्री शिवाजीराव नाईक यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करत आहे. आ. मानसिंगभाऊ यांनी शिराळा मतदार संघाच्या प्रगतीत मोठे योगदान दिले आहे. प्रत्येक गावात लाखो रुपयांची विकासकामे केली आहेत. संस्थात्मक प्रगती साधली आहे. माजी राज्यमंत्री नाईकसाहेब यांच्या अनुभवी नेतृत्वाची त्यांना साथ आहे. विकासाच्या जोरावर मानसिंगभाऊंचा विजय निश्चीत आहे. विकासाबरोबर राहण्याचा आम्ही निर्णय घेतला असून जनतेला भूलथापा मारून फसविणाऱ्या भाजपची साथ सोडली आहे. मानसिंगभाऊंना मोठे मताधिक्य मिळवून देण्यासाठी माझे कार्यकर्ते आहोरात्र कष्ट घेतील, अशी ग्वाही त्यांनी दिली. यावेळी युवक राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष विराज नाईक, तालुक्याचे उपसभापती सम्राटसिंग नाईक, विवेक नाईक, अंत्री खुर्दचे सरपंच दिलीप पाटील, माजी सरपंच दिनकर पाटील व जयसिंगराव चव्हाण, उपसरपंच राजेश चव्हाण, रोहित कदम, शिवाजी चव्हाण, वाय. बी. पाटील, संतोष जाधव, विशाल व अभिजित चौगुले, किरण घेवदे, ब्रह्मदेव पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
Tags
शिराळा प्रतिनिधी