निशिकांत भोसले-पाटील यांचा अर्ज दाखल , इस्लामपुरात रेकॉर्डब्रेक गर्दी

इस्लामपूर : प्रतिनिधी

इस्लामपूर विधानसभा मतदार संघाचे महायुतीचे उमेदवार निशिकांत भोसले-पाटील (दाद) यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आज इस्लामपुरात रेकॉर्ड ब्रेक गर्दी जमली. न भूतो न भविष्यती असे इस्लामपुरात शक्तीप्रदर्शन करून 'महायुती' पुन्हा असा नारा देण्यात आला. आजच्या गर्दीने निशिकांतदादांनी आपली लोकप्रियता दाखवून दिली.

इस्लामपूर मतदार संघातून निशिकांत भोसले-पाटील (दादा) हे  रिंगणात उतरले आहेत. मंगळवारी अर्ज भरण्यासाठी निशिकांत भोसले-पाटील (दादा) यांच्या समर्थकांनी तसेच महायुतीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी जोरदार शक्तिप्रदर्शन केले. आम्ही दादांसोबत म्हणत हजारो कार्यकर्ते निशिकांत भोसले-पाटलांसाठी इस्लामपुरात एकवटले होते. दुपारी १ वाजता वाळवा पंचायत समिती येथील क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या पुतळ्यास अभिवादन करून रॅलीस सुरवात झाली. शहरातील झरी नाका, आझाद चौक, गांधी चौक, पोस्ट ऑफीस या मुख्य मार्गावरून रॅली निघून तहसील चौकात आली. चौकातील छत्रपती शिवाजी महाराज व भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करण्यात आले. त्यानंतर
पारंपरिक वाद्याच्या गजरात हजारो कार्यकर्त्यांच्या साक्षीने प्रत्येक समाजातील एक अशा लाडक्या बहिणींच्या हस्ते निशिकांतदादांचा अर्ज निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे दाखल करण्यात आला. त्यानंतर रॅली कोर्ट इमारत या मुख्य मार्गावरून निघून ती ताकारी रोडवरील खुल्या नाट्यगृहाजवळ आली. येथे रॅलीचे सभेत रूपांतर झाले. यावेळी महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

निशिकांतदादा तुम आगे बढो...

        हलगीचा कडकडाट...फटाक्यांची आतषबाजी... डोक्यावर राष्ट्रवादीची टोपी..अन गळ्यात घड्याळ चिन्हांची पट्टी, हवेत फडकणारे राष्ट्रवादीचे झेंडे घेऊन निशिकांतदादा तुम आगे बढो, अशी घोषणा देत कार्यकर्ते प्रचंड उत्साहाच्या वातावरणात रॅलीत सहभागी झाले. रॅलीच्या मार्गावर ठिकठिकाणी महिलांनी औक्षण आणि विजयासाठी निशिकांतदादांना शुभेच्छा दिल्या.




Post a Comment

Previous Post Next Post