इस्लामपूर : प्रतिनिधी
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये (अजित पवार गट) प्रवेश व महायुतीची उमेदवारी मिळाल्यानंतर निशिकांत भोसले-पाटील (दादा) हे शुक्रवारी रात्री इस्लामपूर मतदार संघात दाखल झाले. इस्लामपुरात महायुतीच्या घटक पक्षातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी त्यांचे जंगी स्वागत केले. यावेळी कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतिषबाजी करत पेढे वाटून जल्लोष केला व विजयाच्या घोषणा दिल्या.
यावेळी बोलताना निशिकांत भोसले-पाटील (दादा) म्हणाले, इस्लामपूर विधानसभा मतदार संघातून महायुतीची उमेदवारी मिळाल्याबद्दल मला अत्यंत अभिमान वाटतो. मतदार संघाच्या विकासासाठी आणि जनतेच्या सेवेसाठी पक्षाकडून मिळालेली ही संधी मला विशेष प्रेरणा देणारी आहे. या निर्णयामुळे माझ्या सेवेला नव्याने बळ मिळाले आहे. इस्लामपूर मतदार संघातील निवडणूक ही राज्यातील जनतेला चुरशीची वाटते. परंतु महायुतीतील आम्हा सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांना ही निवडणूक एकतर्फी वाटते. आमचा विजय हा ऐतिहासिक विजय असेल. आम्ही इस्लामपूर मतदार संघाच्या सर्वांगीण विकासासाठी महायुती सरकारच्या माध्यमातून आपण एकत्रित अधिक सक्षम पावले उचलू. तसेच पक्षाच्या मार्गदर्शनाखाली मतदार संघाच्या हितासाठी कार्यरत राहण्याचे मी येथील जनतेला वचन देतो. तुमचा आशीर्वाद आणि पाठिंबा हीच माझी प्रेरणा आहे. आपण सर्वांनी या परिवर्तनाच्या लढाईत सहभागी व्हावे.
यावेळी जेष्ठ नेते सी.बी.पाटील, राष्ट्रवादीचे वाळवा तालुकाध्यक्ष केदार पाटील, इंजि.विरेंद्र राजमाने, माजी जि. प. सदस्य भीमराव माने, यशवंत पाटील, भाजपाचे प्रदेश सदस्य प्रसाद पाटील, भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष धैर्यशील मोरे, तालुकाध्यक्ष निवास पाटील, इस्लामपूर शहर अध्यक्ष अशोकराव खोत, शहर उपाध्यक्ष भास्कर मोरे, अजित पाटील, अक्षय भोसले-पाटील, प्रा.दत्तात्रय पाटील, प्रवीण पाटील, एस. पी.पाटील, दिनकर कोळेकर, प्रवीण कांबळे, चंद्रकांत वाघमारे, ऍड. सुयोग पाटील, अर्जुन पाटील, युवा मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष चंद्रकांत पाटील, युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष प्रविण माने, सरचिटणीस संदीप सावंत, दादासाहेब रसाळ, सयाजी जाधव, युवा मोर्चाचे अध्यक्ष सतेज पाटील, माजी नगरसेवक मयुर धनवडे, मनोज मगदुम, सरचिटणीस प्रविण परीट, रणजीत माने, विश्वजीत पाटील यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
महापुरुषांना अभिवादन...
महायुतीची उमेदवार निशिकांत भोसले-पाटील (दादा) हे शुक्रवारी रात्री इस्लामपूर मतदार संघात दाखल झाले. दरम्यान, त्यांनी येडेमच्छिंद्र येथे क्रांतीसिंह नाना पाटील यांच्या पुतळ्यास, इस्लामपूर येथे छत्रपती शिवाजी महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास, वाळवा येथे क्रांतिवीर नागनाथ आण्णा नायकवडी यांच्या समाधी स्थळास, आष्टा येथे आ.स्व. विलासराव शिंदे यांच्या शक्तीस्थळास, सांगली येथे माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांच्या समाधीस्थळास, माजी मंत्री स्व.मदन पाटील यांच्या पुतळ्यास, माजी आ.स्व. पै. संभाजीराव पवार यांच्या प्रतिमेस, कवठेपिरान येथे हिंदकेसरी स्व. मारुती माने यांच्या समाधी स्थळास, दुधगाव येथे कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या पुतळ्यास अभिवादन करून दर्शन घेतले. यावेळी स्थानिक पदाधिकाऱ्यांनी त्यांचे स्वागत करून विधानसभा निवडणूक मोठ्या मताधिक्यांनी निवडून देण्याचा निर्धार व्यक्त केला.