रक्षाबंधनाच्या शुभ मुहूर्तावर भाजपाचे जिल्हाध्यक्ष निशिकांत भोसले-पाटील (दादा) यांच्या मार्गदर्शनाखाली प्रकाश हॉस्पिटल अँन्ड रिसर्च सेंटरतर्फे आम्ही वाळवा तालुक्यासह इस्लामपूर विधानसभा मतदार संघातील
महिलांसाठी "निशिकांतदादा लाडकी बहीण आरोग्य योजना" सुरू करत आहोत. खास महिलांसाठी असणारी ही महाराष्ट्रातील पहिलीच आरोग्य योजना असून वर्षभर या योजनेअंतर्गत महिलांवर सर्व शस्त्रक्रिया व औषधोपचार मोफत केले जाणार आहेत. त्यामुळे महिलांसाठी ही योजना नवसंजीवनी ठरणार आहे. तरी महिलांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्रकाश हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटरचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.भूपाल गिरीगोसावी यांनी पत्रकार बैठकीत केले.
यावेळी एल.आर.पी.आयुर्वेदिक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.अभिमन्यू पाटील, डॉ.प्रसन्न गवळी, डॉ.संजय पाटील प्रमुख उपस्थित होते.
डॉ.भूपाल गिरीगोसावी म्हणाले, या धावपळीच्या युगात महिलांच्या आरोग्याचे प्रश्न मोठ्या प्रमाणात उद्भवत आहेत. त्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. पैशाअभावी अनेक महिलांना उपचार घेणे शक्य होत नाही. त्यामुळे या माता-भगिनी तंदुरुस्त रहाव्यात, त्यांचे आरोग्य उत्तम व निरोगी राहावे, या हेतूने रक्षाबंधनाच्या शुभ मुहूर्तावर वाळवा तालुक्यासह इस्लामपूर विधानसभा मतदार संघातील महिलांसाठी आम्ही "निशिकांतदादा लाडकी बहीण आरोग्य योजना" सुरू करत आहोत. या योजनेचा कालावधी १९ ऑगस्ट २०२४ ते १८ ऑगस्ट २०२५ पर्यंत असणार आहे. या कालावधीत महिलांवर सर्व शत्रक्रिया, तपासणी, औषधोपचार अगदी मोफत करण्यात येणार आहेत. या योजनेसाठी महिलांना कोणतीही वयाची अट नाही. तरी महिलांनी या योजनेचा लाभ घ्यावा.
डॉ.अभिमन्यू पाटील म्हणाले, देशात जे प्राचीन आयुर्वेदिक शास्त्र आहे. त्याचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी व आयुर्वेदिक शास्त्राचे महत्व नागरिकांपर्यंत पोहचावे, या हेतूने आम्ही भाजपचे जिल्हाध्यक्ष निशिकांत भोसले-पाटील (दादा) यांच्या मार्गदर्शनाखाली प्रकाश शिक्षण मंडळाच्या एल.आर.पी. आयुर्वेदिक कॉलेज व हॉस्पिटलमध्ये पंचक्रमाविषयी तसेच सर्व तपासण्या, औषधोउपचार व शस्त्रक्रिया, या सर्व बाबी पूर्णपणे मोफत करण्यात येत आहेत. तरी वाळवा तालुक्यासह इस्लामपूर विधानसभा मतदार संघातील रुग्णांनी याचा लाभ घ्यावा.
यावेळी डॉ.सोनल शहा, डॉ.अमित शेंडगे, विनय चव्हाण, विश्वजीत पाटील उपस्थित होते.
महिलांना या मोफत सुविधांचा मिळणार लाभ...
निशिकांतदादा लाडकी बहीण आरोग्य योजनेअंतर्गत महिलांना सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया, हॉस्पिटलमधील औषधोपचार, सोनोग्राफी, ईसीजी, एक्सरे, सी.टी.स्कॅन, एम.आर.आय, अँजिओग्राफी, मूलभूत रक्तचाचण्या, नॉर्मल डिलीव्हरी व सिझेरिअन आदी सुविधांचा मोफत लाभ मिळणार आहे.
Tags
इस्लामपूर प्रतिनिधी