सांगली प्रतिनिधी
सांगली लोकसभा मतदारसंघात दोन वेळा निवडून आलेले आणि तिसऱ्यांदा मैदानात उतरलेल्या खासदार संजय पाटील यांच्या नावावर स्थावर आणि जंगम मालमत्ता ४८ कोटी ३१ लाख ३९ हजार रुपये इतकी आहे.
खासदार पाटील यांच्यापेक्षा पत्नीची जंगम मालमत्ता तब्बल ३० कोटी ५० लाखांनी अधिक आहे. पत्नी ज्योती यांनी जंगम मालमत्तेपैकी ३२ कोटी ३१ लाख रुपये असुरक्षित कर्ज म्हणून एसजीझेड ॲण्ड एसजीए शुगर कंपनी तुरचीला दिले आहेत.
तर अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांनी आपल्या
प्रतिज्ञापत्रानुसार त्यांची संपत्ती ३० कोटी ५२ लाख ४१ हजार ७३५ रुपयांची आहे.
निवडणूक आली की, मतदारांना उमेदवारांनी दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रामध्ये उल्लेख केलेली मालमत्ता किती रुपयांची असेल, असा प्रश्न पडतो. सांगलीचे खासदार संजय पाटील यांनी २०१९ च्या निवडणुकीत त्यांची मालमत्ता १९ कोटी ११ लाख, ९२ हजार रुपये इतकी असल्याचे नमूद केले होते, तर तेव्हा २ कोटी ३३ लाख रुपये कर्ज असल्याचे जाहीर केले होते.
तिसऱ्यांदा उमेदवारीसाठी अर्ज दाखल करताना खासदार पाटील यांनी प्रतिज्ञापत्रात जंगम मालमत्ता २ कोटी ४८ लाख ४५ हजार रुपये असल्याचे जाहीर केले आहे, तर स्थावर मालमत्ता ४५ कोटी ८२ लाख ९३ हजार रुपये इतकी आहे. उत्पन्नाचा स्रोत शेती आणि व्यवसाय, असा उल्लेख आहे. बँका व वित्तीय संस्थांकडील कर्ज ५३ कोटी २ लाख ५२ हजार रुपये इतके आहे. प्रतिज्ञापत्रातील आकडेवारीनुसार, मागील पाच वर्षांच्या तुलनेत मालमत्तेमध्ये २९ कोटी रुपयांची भर पडली असल्याचे दिसून येते, तसेच कर्जाचा आकडाही ५१ कोटी रुपयांनी वाढला आहे.
संजयकाकांकडे गाडीच नाही
खासदार संजयकाका यांनी प्रतिज्ञापत्रामध्ये त्यांच्याकडे कोणत्याही प्रकारची गाडी नसल्याचे नमूद केले आहे. त्यांच्याकडे दहा लाखाचे सोने, तर पत्नीकडे २४ लाखांचे सोने आहे.
एक गुन्हा दाखल
२००५ मध्ये मनाई आदेश असताना बेकायदा सभा घेतल्याबद्दल खासदार संजय पाटील यांच्याविरुद्ध तासगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.
तसेच काँग्रेसचे बंडखोर नेते विशाल पाटील यांनी उमेदवारी अर्जासोबत दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार त्यांची संपत्ती ३० कोटी ५२ लाख ४१ हजार ७३५ रुपयांची आहे. मागील लोकसभा निवडणुकीतील आकडेवारीच्या तुलनेत ८ कोटी ८० लाख ८४ हजार ७९९ रुपयांनी त्यांच्या संपत्तीत वाढ झाली आहे.
विशाल पाटील यांच्या नावावर २६ कोटी ७४ लाख ९३ हजार ३९ तर त्यांच्या पत्नी पूजा पाटील यांच्या नावे ३ कोटी ७७ लाख ४८ हजार ६९६ रुपयांची संपत्ती आहे. त्यात जंगम व स्थावर मालमत्तेचा समावेश आहे. विशाल पाटील यांच्याकडे १० कोटी ५९ लाख १३ हजार ८३४ रुपयांची जंगम तर १६ कोटी १५ लाख ७९ हजार २०५ रुपयांची स्थावर मालमत्ता आहे. पत्नी पूजा यांच्या नावे ३ कोटी ३ लाख ७३ हजार ३०७ रुपयांची जंगम तर ७३ लाख ७५ हजार ३८९ रुपयांची स्थावर मालमत्ता आहे.
लोकसभेच्या २०१९च्या निवडणुकीत सर्व उमेदवारांमध्ये सर्वाधिक संपत्ती विशाल पाटील यांची होती. २०२४ च्या निवडणुकीत आतापर्यंत अर्ज दाखल केलेल्या उमेदवारांत संजय पाटील यांची संपत्ती सर्वाधिक आहे.
विशाल पाटील यांच्या नावे २०१९ मध्ये १० कोटी ३० लाख ६२ हजार ५९४ रुपयांचे कर्ज होते. सध्या ७ कोटी ६५ लाख २ हजार ५६० रुपयांचे कर्ज आहे. त्यांच्या पत्नीच्या नावे ६१ लाख ७६ हजार ९८९ रुपयांचे कर्ज आहे. पाच वर्षात २ कोटी ६५ लाखाने त्यांच्या कर्जाचा भार कमी झाला आहे.
Tags
सांगली प्रतिनिधी