बाप नावाचा जिवलग मित्र – संस्कारांचा उत्तम ग्रंथ” : माजी खासदार डॉ. सुनील बळीराम गायकवाड


लातूर – प्रतिनिधी
प्राचार्य विठ्ठल मोरे यांच्या स्मृतीदिनानिमित्त भालचंद्र ब्लड बँक, लातूर येथे “बाप नावाचा जिवलग मित्र” या प्राचार्य संग्राम मोरे लिखित ग्रंथाचे प्रकाशन नुकतेच संपन्न झाले. या प्रकाशन समारंभात प्रमुख उपस्थिती लाभली होती माजी खासदार डॉ. सुनील बळीराम गायकवाड, प्राचार्य नागोराव कुंभार, प्रा. फ. म. शाहजिंदे, पुरस्कारार्थी प्राचार्य जोगदंड आणि प्राचार्य कुसुम मोरे यांची.

या वेळी बोलताना डॉ. सुनील बळीराम गायकवाड म्हणाले, “बाप हा फक्त जन्मदाता नसून तो एक जिवलग मित्र, मार्गदर्शक आणि संस्कारांचा उत्तम ग्रंथ असतो. ‘बाप नावाचा जिवलग मित्र’ हा ग्रंथ वाचकांच्या मनात नात्यांची नव्याने जाणीव जागवतो आणि मूल्यांची शिकवण देतो. प्राचार्य संग्राम मोरे यांनी आपल्या सर्जनशील लेखणीतून पित्याच्या भूमिकेचे भावनिक आणि सामाजिक पैलू फार सुंदर रीतीने मांडले आहेत.”

कार्यक्रमात वक्त्यांनी प्राचार्य विठ्ठल मोरे यांच्या कार्याचा गौरव करत, त्यांच्या स्मृतीस अभिवादन केले. “बाप नावाचा जिवलग मित्र” या ग्रंथाच्या माध्यमातून समाजात कौटुंबिक मूल्यांचा प्रसार, संस्कारांची जपणूक आणि वडिलांच्या भूमिकेचे महत्व अधोरेखित करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करण्यात आला असल्याचे मान्यवरांनी सांगितले.

या प्रकाशन सोहळ्याला शहरातील साहित्य, शिक्षण आणि सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती लक्षणीय होती. कार्यक्रमाचे आयोजन प्रेरणादायी ठरले.आभार डॉ संजय मोरे यांनी मानले.उपस्थितानी प्राचार्य डॉ संग्राम मोरे यांचे पुष्प गुच्छ देऊन स्वागत करीत शुभेच्छा दिल्या.

Post a Comment

Previous Post Next Post