शिराळा (प्रतिनिधी) : पराभव दिसू लागल्याने भाजप उमेदवाराकडून शिराळा मतदार संघात अफवा पसरवून संभ्रम निर्माण करण्याचे काम सुरू आहे. मतदारांनी अफवांवर विश्वास न ठेवता महाविकास आघाडीचे उमेदवार मानसिंगभाऊंना मोठ्या मताधिक्याने विजयी करावे, असे आवाहन राजारामबापू पाटील साखर कारखान्याचे अध्यक्ष प्रतीक पाटील यांनी केले.
रेठरे धरण, वाघवाडी, जांभूळवाडी, शिवपुरी व लाडेगाव (ता. वाळवा) येथे महाविकास आघाडीचे उमेदवार आ. मानसिंगभाऊ नाईक यांचा प्रचारार्थ दौऱ्यावेळी ते बोलत होते. राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष देवराज पाटील, युवक राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्ष विराज नाईक, जि. प. माजी उपाध्यक्ष रणजित पाटील, संचालक अतुल पाटील, हर्षवर्धन पाटील, प्रतीक पाटील आदी मान्यवर प्रमुख उपस्थित होते.
अध्यक्ष श्री. पाटील म्हणाले, पाच वर्षात केलेल्या विकास कामांच्या जोरावर मानसिंगभाऊंचा विजय निश्चित होणार आहे. त्यांनी औद्योगिकरण वाढवत मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती केली आहे. महिला, शेती, शेतकऱ्यांच्या प्रगतीत त्यांचा मोठा वाटा आहे. विरोधी उमेदवारांकडे विकासाचे मुद्देच नाहीत. त्यांचे मतदार संघाच्या विकासात योगदान नाही. ते अफवा पसरवून जनतेची फसगत करून स्वार्थ साधण्याचा प्रयत्नात आहेत. कार्यकर्त्यांनी जागरूक राहून मतदार अफवांना बळी पडणार नाहीत, याची काळजी घ्यावी. आपल्या उमेदवाराचे चिन्ह तुतारी वाजवणारा माणूस असून ते मतदारांपर्यंत पोचवावे.
राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष म्हणाले, शिराळा मतदार संघात येणाऱ्या वाळव्यातील 48 गावातील मतदारांनी लक्षात ठेवावे, मानसिंगभाऊंना विजयी करून विधानसभेत पाठवल्याने आपले नेते प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटीलसाहेबांच्या पाठीशी एका आमदाराची ताकद वाढणार आहे. महाविकास आघाडी राज्यात सत्तेवर येणार असून पाटीलसाहेबांवर राज्याच्या नेतृत्वाची जबाबदारी येणार आहे. त्यामुळे तुमचे मत मानसिंगभाऊंच्या रूपाने जयंतराव पाटील यांना मिळणार आहे. त्यासाठी मानसिंगभाऊंचा विजय दिमाखदार व्हायला हवा. कार्यकर्त्यांनी झटून काम करावे. भूलथापा व अफवांवर विश्वास ठेवू नये.
युवकचे जिल्हाध्यक्ष श्री. नाईक म्हणाले, शिराळा मतदार आ. मानसिंगभाऊ नाईक साधलेल्या 2 हजार 275 कोटी रुपयांच्या विकास कामांच्या जोरावर पुन्हा निवडणूक लढवत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आ. जयंतराव पाटील व माजी राज्यमंत्री शिवाजीराव नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली व त्यांनी घालून दिलेल्या विकासाच्या वाटेवर चालत आहेत. मतदारांनी काम करणाऱ्या मानसिंगभाऊना पुन्हा संधी द्यावी. तुतारी वाजवणारा माणूस चिन्हासमोरील बटण दाबून मोठ्या मताधिक्याने विजयी करावे.
यावेळी जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष श्री. पाटील, कारखान्याचे संचालक श्री. पाटील यांच्यासह ज्या त्या गावातील मान्यवरांनी मनोगते व्यक्त केले. उमेदवार मानसिंगभाऊ यांना प्रत्येक गावात मताधिक्य मिळवून देवू, असा विश्वास व्यक्त केला. यावेळी राजारामबापू उद्योग समूहातील पदाधिकारी, स्थानिक नेते मंडळी व पदाधिकारी, आजी-माजी सरपंच्, उपसरपंच, सदस्य, इतर संस्थांचे पदाधिकारी, मान्यवर मंडळी व कार्यकर्ते, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Tags
शिराळा प्रतिनिधी