विरोधकांच्या भूलथापांना आता जनता फसणार नाही -निशिकांत भोसले पाटील


इस्लामपूर : प्रतिनिधी
आ.जयंत पाटील गेली ३५ वर्षे येथील मतदारांना विकास कामांची स्वप्ने दाखवून व भूलथापा मारून त्यांची फसगत करत सत्ता भोगत आहेत. परंतु आता इस्लामपूर विधानसभा मतदार संघातील जनता त्यांच्या या भूलथापांना बळी न पडता परिवर्तनाच्या बाजूने उभी राहील व मला मोठ्या मताधिक्यांनी विजयी करेल, असा विश्वास इस्लामपूर विधानसभा मतदार संघाचे महायुतीचे उमेदवार निशिकांत भोसले-पाटील (दादा) यांनी व्यक्त केला.

इस्लामपूर विधानसभा मतदार संघात प्रचार दौऱ्या दरम्यान ते बोलत होते. यावेळी त्यांनी इस्लामपूर शहरातील व्यापारी असोसिएशन, अजिंक्य नगर, दगडी बंगला आदी भागातील नागरिकांशी संवाद साधला व त्यांनी गेल्या अनेक वर्षापासुन प्रलंबीत असणार्‍या प्रश्नांची गार्‍हाणी मांडल्या.यावेळी परीवर्तनाच्या बाजुने आम्ही आहोत,असे वचन उपस्थितांनी दिले. यावेळी राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष केदार पाटील प्रमुख उपस्थितीत होते.

निशिकांत भोसले-पाटील (दादा) म्हणाले, आ.जयंत पाटील यांच्याकडून विकास कामांबाबत खोट्या प्रचाराचा बनाव सुरू आहे. परंतु येथील जनता त्यांनी केलेला ३५ वर्षातील विकास पाहत आहे. त्यांना साधे येथील मूलभूत प्रश्न सोडवता आलेले नाहीत. व्यापारी वर्गाचे प्रश्न जैसे थे आहेत. त्यांनी आजपर्यंत फक्त बारामतीच्या गप्पा मारल्या. त्यामुळे आता मतदार बांधव ही त्यांच्या बनावाला परिवर्तन घडवून उत्तर देतील. लोकप्रतिनिधीचे कर्तृत्व कामातून उभा राहते. मला विरोधकांप्रमाणे फक्त निवडणुकीत जनतेचा पुळका येत नाही. लोकसेवेचा वसा, वारसा जपण्यात मी कायम पुढे आहे. सत्ता असो व नसो पण जनसेवेचा वारसा मी कायम ठेवला आहे. मी कोणतीही सत्ता नसताना गेल्या पाच वर्षात इस्लामपूर विधानसभा मतदार संघात केलेली विकास कामे तुमच्या समोर आहेत. हा विकास आणखी गतिमान करण्यासाठी मला या निवडणुकीत आशीर्वाद द्यावेत.

यावेळी महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते, मतदार मोठ्या संख्येने उपस्थित होते.


.पुन्हा तेच कॅसेट सुरू..
  येथील विद्यमान आमदारांनी आजपर्यंत जनेतला खोटी आश्वासन देऊन सत्ता भोगली. परंतु सत्यात काही उतले नाही. आता निवडणुकीच्या तोंडावर त्यांच्याकडून पुन्हा तेच आश्वासनाचे कॅसेट सुरू झाले आहे. मी मुख्यमंत्री होणार असल्याचे ते जनतेला सांगून विकास कामांचे स्वप्न ते जनतेला दाखवत आहेत. परंतु जनता त्यांच्या आश्वासनाला बळी पडणार नाही, असेही निशिकांत भोसले-पाटील म्हणाले. 

Post a Comment

Previous Post Next Post