सांगली : कुत्रे आडवे आल्याने त्याला वाचविताना महापालिका आयुक्तांची गाडी विद्युत खांबाला जाऊन धडकली. यात आयुक्तांच्या डोक्याला मार लागल्याने मिरजेतील एका खासगी रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आले आहे. ही घटना काल बुधवारी सायंकाळी साडे सहा वाजता घडली.
सांगली-मिरज-कुपवाड महापालिकेचे आयुक्त तथा प्रशासक शुभम गुप्ता हे एका कार्यक्रमाच्या निमित्ताने विश्रामबागला गेले होतेे. स्फुर्ती चौकातून गर्व्हमेंट कॉलनीकडे जाताना येथील बसथांब्याजवळ त्यांची गाडी आली. गाडीच्या आडवे कुत्रे आल्याने त्याला वाचविण्याच्या प्रयत्नात गाडी जाऊन रस्त्याकडेला असलेल्या विद्युत खांबावर आदळली त्यांच्या कारमधील एअर बॅग खुल्या झाल्या, मात्र तरीही आयुक्तांच्या डोक्याला मार लागला. डोक्याला जखम झाल्याने त्यांना तातडीने मिरज रोडवरील खासगी रुग्णालयात दाखल केले.
महापालिकेत अपघाताचे वृत्त धडकताच अधिकारी, कर्मचार्यांनी रुग्णालयात धाव घेतली. पोलिस पंचनामा रात्री उशिरापर्यंत झाला नव्हता. गव्हर्मेंट कॉलनीतील रस्त्यावरील हे खांब उंच असल्याने तसेच ते गंजल्याने त्यांचा अंदाज येत नाही. याबाबत अनेकदा महापालिकेत तक्रारीही दाखल झाल्या होत्या, मात्र याठिकाणी सुरक्षा उपाय केले नसल्याने आता महापालिका आयुक्तांनाच या विद्युत खांबामुळे अपघातास सामोरे जावे लागले.
डोक्याला टाके, मानेला दुखापत
मेंदू शल्यविशारद डॉक्टर रवींद्र पाटील म्हणाले की, आयुक्तांच्या डोक्याचा सिटी स्कॅन करण्यात आला. त्यात दोष नाही. डोक्याला जखम आहे, मानेला थोडा मार लागला आहे. आता त्यांची प्रकृती स्थिर असली तरी वैद्यकीय निरीक्षणाखाली त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
Tags
सांगली प्रतिनिधी