जत तालुक्यातील सनमडी
सांगली प्रतिनिधी
जत तालुक्यातील सनमडी येथील नागू ज्ञानू म्हारनूर यांचे पत्रावजा गवती छप्परचे घर गॅस सिलेंडरच्या स्फोटात जळून खाक झाले आहे. या दुर्घटनेत आठ शेळ्या आगीत होरपळून दगावल्या आहेत. संसार उपयोगी साहित्य व रोख रक्कम असे मिळून तीन लाखाचे नुकसान झाले आहे. या घटनेमुळे म्हारनूर कुटुंब उघड्यावर पडले आहे. ही घटना शुक्रवारी रात्री साडे अकरा वाजण्याच्या सुमारास घडली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, सनमडी येथील नागू म्हारनूर यांचे घर गावापासून दोन किलोमीटर अंतरावर आहे. ते मोलमजुरी करणारे गरीब कुटुंब आहे. शुक्रवारी रात्री जेवण केल्यानंतर आजोबा व नात असे दोघेजण अंगणात झोपी गेले होते.
दरम्यान, रात्री साडेअकरा वाजण्याच्या सुमारास अचानक गॅस सिलेंडरचा स्फोट झाला. या स्फोटाने दोघेही जागे झाले. परंतु आगीने रौद्ररूप धारण केले होते यातून घराशेजारी असणाऱ्या शेळ्यांच्या गोठयातूनही शेळ्या बाहेर काढता आल्या नाहीत. यात आठ शेळ्या जागीच आगीत होरपळून मृत्यू झाल्या. तसेच घरातील संसार उपयोगी साहित्य जळून खाक झाले आग विझवण्याचा प्रयत्न केला परंतु आग आटोक्यात आलेली नव्हती.
Tags
सांगली प्रतिनिधी