सांगली : कवठेमहांकाळ तालुक्यातील जांभूळवाडी नजीक क्रूझरजीप आणि खासगी ट्रॅव्हल्सचा भीषण अपघात. या अपघातात जीप मधील पाचजणाचा जागीच तर दोन जखमीचा रुग्णालयात नेले जात असताना मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली. मृतांची संख्या वाढण्याची शक्यता प्रत्यक्षदर्शीनी व्यक्त केली आहे. बुधवारी रात्री साडेसात वाजण्याच्या सुमारास विजापूर - गुहागर महामार्गांवर हा अपघात झाला आहे.
घटनास्थळावरुन मिळालेल्या माहितीनुसार, जमखंडी (ता. बागलकोट, कर्नाटक) येथून क्रुझरमधून लग्नासाठीचे वऱ्हाड सावर्डे (ता. तासगाव, जि. सांगली) येथे येत होते. दोन क्रुझर तसेच नवरी मुलीसाठी स्वीफ्ट मोटार होती. ही वाहने बुधवारी सायंकाळी साडेसातच्या सुमारास विजापूर-गुहागर महामार्गावरील जांभुळवाडी येथे आली. यावेळी १४ जण बसलेल्या क्रुझरने पाठीमागून मुंबईला निघालेल्या ट्रॅव्हल्सला जोराची धडक दिली. या धडकेत पाचजण जागीच ठार झाले. तर दोघांना उपचारासाठी रुग्णालयात नेताना वाटेतच त्यांचा मृत्यू झाला. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. कवठेमहांकाळ आणि जत पोलिसांनी तातडीने घटनास्थळी भेट दिली. तिघां जखमींची प्रकृती गंभीर आहे. गंभीर जखमी झालेल्यांवर ढालगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार करुन पुढील उपचारासाठी त्यांना मिरज सिव्हिल हॉस्पिटलला हलवले.
अपघातानंतर घटनास्थळीचे दृश्य हृदय पिळवटून टाकणारे होते. इतर वऱ्हाडींनी आक्र ोश केला. रात्रीची वेळ असल्याने मृतदेह काढण्यात अडचणी येत होत्या. अपघातानंतर क्रु झरने पेट घेतला. अग्निशमन दलाला पाचारण केल्यानंतर अग्निशमन दलाने आग विझविली. यावेळी बघ्यांची प्रचंड गर्दी जमली होती.
चौकट
फराळाचे साहित्य रस्त्यावर
जमखंडीवरुन सावर्डेला निघालेल्या वऱ्हाडींनी आपल्यासोबत लग्नासाठी आणलेले साहित्य, रुखवत अपघातानंतर रस्त्यावर पडले होते. घटनास्थळाचे दृश्य विदारक होते.
Tags
जत प्रतिनिधी